आज सकाळ मस्त झाली. आयत्या वेळी गाडीने असहकार पुकारल्याने पी. एम. टी. ने मंडईत गेलो. सकाळी 7 वाजता अजून दुकाने उघडत होती. अत्तार गल्ली- जिथे सगळं देवपूजेचं सामान मिळतं तिथला एक दुकानदार त्याची सकाळची कामे रेडिओ ऐकता ऐकता तल्लीन होऊन करत होता. बडी देर भई नंदलाला लागलं होतं. इतक्या भसाड्या आवाजात हा दुकानदारही ते गाणं म्हणत होता आणि रफीसाहेबांना क्या बात है... क्या गाया है.. वाह.. करून दादही देत होता की ते पाहूनच खूप छान वाटलं आम्हाला. असं निःसंकोचपणे आपल्या आहे त्या आवाजात हल्ली किती वेळा गातो आपण? फार आवडलं. नंतर परत बसमध्ये बसलो तर पहिली दुसरीच ट्रिप असल्याने ड्रायव्हर आणि कंडक्टर पण फुल टू जोशमध्ये. आम्ही दोन चारच माणसं होतो. त्यांची तिकिटे दिल्यावर कंडकटर साहेबांनी मोबाईल वर लता बाईंची सुंदर गाणी लावली. आणि ड्रायव्हरला सगळी गाणी तोंडपाठ. एक कडवं झालं की तो फर्माईश करायचा- ए आता अनाडी मधलं लाव गाणं, लगेच ते गाणं लता आणि ड्रायव्हर साहेब म्हणणार. मग एक कडवं झालं की प्रेमरोग मधलं , मग अजून दुसरं, मग लगेच किशोरकुमार आणि बॉम्बे टू गोवा.. अरे मज्जाच होती आज आमची. इतकं मस्त वाटलं की बास. सकारात्मक व्हा म्हणून क्लास लावायला जाहिरात असते सध्या.. आजूबाजूलाच पाहिलं तर किती छोट्या गोष्टींमध्ये केवढी प्रचंड सकारात्मकता, आनंद भरलाय नाही? शोधतच नाही हल्ली कुणी. हॉटेलवर आलो आणि आम्हीपण रेडिओ लावून घसा साफ करूनच घेतला आज. आम्हीच आशा- लता आणि आम्हीच किशोर- रफी. उगीचच खूप छान वाटतंय आज. -- फीलिंग लैच फ्रेश 😊😊😊😊
Comments
Post a Comment